सुंदर साजिरा श्रावण आला!
हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला। कालचक्र हे अविरत फिरत असते. कोणासाठी ते थांबत नसते. चैत्र पासून सुरु होणाऱ्या मराठी मासमालिकेतील प्रत्येक महिन्याचे रंगरूप वेगवेगळे असते. कुणाला चैत्राच्या पालवीची मोहिनी पडते, तर कोणाला वैशाखवणवा आवडतो, कुणाला मेघश्याम आषाढ हवाहवासा वाटतो, तर कुणी सोनेरी अश्विन साठी करता त्या सर्वांमधून सुसह्य किंवा आल्हाददायक जर कोणी असेल तर तो आहे "हिरवा श्रावण". खरंच !! 'हिरवा श्रावण' नाव अगदी सार्थकी लागतं. त्या हिरव्या रंगाच्याही किती विविध छटा असतात. कुठे गर्द हिरवा , तर कुठे काळपट हिरवा, तर कुठे पोपटी या सर्व रंग छटातुन चैतन्याचा, सौंदर्याचा साक्षात्कारच घडत असतो. इतर रंगांची ही उधळण झालेली असते, जणू काही आकाशातील ढग रंगपंचमी खेळत आहेत. ती निसर्गदृश्यही अतीव मनमोहक असतात. नुकतीच पावसाची सर येऊन गेली आहे, आकाश अजून सावळंच दिसतयं एक पुसटसा इंद्रधनुष्य त...