सुंदर साजिरा श्रावण आला!
सुंदर साजिरा श्रावण आला।
कालचक्र हे अविरत फिरत असते. कोणासाठी ते थांबत नसते. चैत्र पासून सुरु होणाऱ्या मराठी मासमालिकेतील प्रत्येक महिन्याचे रंगरूप वेगवेगळे असते. कुणाला चैत्राच्या पालवीची मोहिनी पडते, तर कोणाला वैशाखवणवा आवडतो, कुणाला मेघश्याम आषाढ हवाहवासा वाटतो, तर कुणी सोनेरी अश्विन साठी करता त्या सर्वांमधून सुसह्य किंवा आल्हाददायक जर कोणी असेल तर तो आहे "हिरवा श्रावण".
खरंच !! 'हिरवा श्रावण' नाव अगदी सार्थकी लागतं. त्या हिरव्या रंगाच्याही किती विविध छटा असतात. कुठे गर्द हिरवा , तर कुठे काळपट हिरवा, तर कुठे पोपटी या सर्व रंग छटातुन चैतन्याचा, सौंदर्याचा साक्षात्कारच घडत असतो. इतर रंगांची ही उधळण झालेली असते, जणू काही आकाशातील ढग रंगपंचमी खेळत आहेत. ती निसर्गदृश्यही अतीव मनमोहक असतात. नुकतीच पावसाची सर येऊन गेली आहे, आकाश अजून सावळंच दिसतयं एक पुसटसा इंद्रधनुष्य त्या सावळ्या बॅकग्राऊंडला अगदी शोभून दिसतो, जणू काही पृथ्वी आणि आकाश यांच्या मधला झुलता पूलच! हिरवे गालिचे, वेलीवरची फुले, पंख झाडणारे पक्षी, भिजलेली झाडे , मध्येच पडणारा रिमझिम पाऊस आणि क्षणात पडणार ऊन. हे सारेच श्रावणाला त्याचं वेगळेपण प्राप्त करून देतात. म्हणूनच बालकवी म्हणतात,
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.
श्रावण हा मराठी मासचक्रातील पाचवा महिना उकाड्याने हैराण करणारे चैत्र-वैशाख गेल्यावर ज्येष्ठ-आषाढात पावसाचा धुवाधार वर्षाव सुरु होतो, वातावरण कुंद आणि ढगाळलेले असते. घराबाहेर पडणे देखील पुष्कळदा अवघड होते अशावेळी माणसाला दिलासा लाभतो तो श्रावणात.
श्रावण मास म्हणजे खरं तर 'श्रवण' सृष्टीचे श्रुतीमधुर संगीत ऐकण्याचे भाग्य या कालखंडात लाभते. सरसरत येणाऱ्या-जाणाऱ्या पर्जन्य सरींच्या पदन्यासाचा कोमल पदरव कानी पडतो तो याच महिन्यात, तृप्त विहंगमाचे मंजुळ कूजन फार दिवसांनी ऐकायला मिळते तेही याच महिन्यात, गोरख्यांचा मंजूळ पावा श्रावणातच ऐकायला मिळतो, याशिवाय घराघरात व मंदिरात गोड अभंगांची मैफल जमते ती श्रावणातच!
"खिल्लारे हि चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजुळ पाव गात त्याचा श्रावण महिमा एकसुरे"
श्रावण शब्द ऐकताच "श्रावणात घननिळा बरसला" हे लता ताईंचे शब्द मनःपटलावर गुंजारव करू लागतात. संगीतप्रेमींना हा श्रावण म्हणजे पर्वणीच! 'श्रावणधारा' 'श्रावणसरी' अशा नानाविध कार्यक्रमांचे आयोजन करून श्रावणाचे अनेक पैलू , अनेक रूपं आपल्या संगीतातून हे संगीतप्रेमी रसिकजनांना उलगडून दाखवत असतात.
कवी आणि चित्रकारांना जसा श्रावण हवाहवासा तसाच तो निसर्गप्रेमी आणि भटक्यांनाही ! गड-किल्ल्यांचे मोहक रूप अनुभवायला याहून चांगला मुहूर्त तो कोणता असणार ?डोंगरदऱ्यातून फिराण्याची लहानथोर मंडळींची हौस वर्षा सहलीचा रूपाने याच कालखंडात पूर्ण होते, आणि त्या हिरव्या गालिचा पांघरलेल्या डोंगर-दर्या यांना सोबत असते झुळझुळणार्या धबधब्यांची!!
हे धबधबे या निसर्ग चित्रात अनोखे रंग भरत असतात हे मात्र नक्की. कधी उंच उंच कड्यावरून कोसळत निसर्गाचे रौद्र रूप दाखवतात तर काही अलगद तुषार उडवत मनसोक्त भिजण्यासाठी आवाहन करत असतात.
पण खरंच!
निसर्गाच्या वरदहस्तामुळे श्रावण देखणा होऊन जातो.
श्रावण सरीत मृदगंध ओला फुला फुलातून गंध भरला
ब्रह्मकमळ, अनंत, केली, तेरडा,गंधारी, अग्निशिखा, कर्णफुले, घाणेरी, सोनकी, नागफणी, मंजिरी, तेरडा सोनटक्का, गौरीची फुलं या पावसाळ्यातला फुलांचा सडाच सडा डोंगर उतारावर , रानामाळावर पडलेला असतो. बालकवी म्हणतात तसं,
सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला
त्यामुळे निसर्गप्रेमींना ही फार मोठी कुतुहलाची बाब ठरते .
श्रावण भक्तिरसात अगदी न्हाऊन निघतो. आपल्या सगळ्या सणांना कृषिसंस्कृतीचं अधिष्ठान आहे. त्यामुळे सणाद्वारे निसर्गाचं कोडकौतुक आलचं! हे सण आणि व्रत-वैकल्य यांनी मानवाचे सांस्कृतिक व धार्मिक जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर ,श्रीकृष्णजयंती, पोळा, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन पिठोरी अमावस्या असे सण साजरे करण्यात श्रावण कधी सरून जातो कळतही नाही. 'उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको' असं व्रतामधून सांगणाऱ्या अनेक कहाण्या साध्या सोप्या भाषेत जीवनाचा अर्थ सांगून जातात.
चल ग सये वारुळालाssनागोबाला पुजायला।
असं म्हणत गावातील सर्व स्त्रिया वारुळाच्या इथे जाऊन पूजा करायच्या. तर मुली झाडावरील बांधलेले झोके खेळण्यात मग्न व्हायच्या. आता असं चित्र फार कमी पाहायला मिळत असलं तरी नागोबाची पूजा मात्र केली जातेच. पोळा आणि नारळी पौर्णिमा हे कृतज्ञता दर्शवणारे सण याच महिन्यात येतात. आपल्याला अन्न मिळावे यासाठी वर्षभर खपणार्या बैलांच्या विश्रांतीचा आणि मानाचा दिवस म्हणजे पोळा !शेतकऱ्याला या सणाचं जरा कौतुक जास्तच आणि का असू नये स्वतःच्या पोटच्या पोरा प्रमाणेच ते आपल्या बैलांची काळजी घेत असतात. पोळ्याच्या दिवशी त्यांचे पोट भरून लाड कौतुक करतात व त्यांची पूजा करतात. तर नारळीपौर्णिमेला दर्यावर्दी लोक सागराची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात, व आपल्या उपजीविकेचे साधन असणाऱ्या त्या समुद्राच्या कृतज्ञताभाव व्यक्त करतात.या शिवाय गोपाळकाल्याचा सण अमाप आनंद उत्साह घेऊनच येतो। ह्या सर्वांमध्ये श्रावणातील मंगळवारी मंगळागौरीचे विशेष आकर्षण! शहर संस्कृती मधल्या जवळ-जवळ सर्वांनाच टीव्हीवरील मालिकांमुळे मंगळागौरीची ओळख आहे. तर श्रावणातल्या मंगळवारी नव्या सुनेची मंगळागौर साजरी करतात. पूर्वीच्या अरेंज मॅरेज या पद्धतीत नव्या सुनेचे अवघडलेपण दूर करण्यासाठी म्हणून ही पद्धत केली गेली असणार. यात मंगळा गौरीची म्हणजेच पार्वतीची पूजा केली जाते. नैवेद्य दाखवला जातो व रात्री जागरण करून सर्व स्त्रिया हलके फुलके खेळ खेळतात. रोजच्या चूल व मूल या जपमाळेतून त्यांना तेवढाच विरंगुळा. मंगळागौरीच्या पूजेला अनेक पत्री वापरली जातात. अशी अनेक झाडे झुडपे आहेत जी फक्त ह्या श्रावणातच येतात. जसं की आघाडा, कारवीची फुले, धोत्रा इत्यादी. गावातल्या बाया बापड्या आणि कुमारिका यांचा ह्या पत्री गोळा करण्याचा एक वेगळाच कार्यक्रम असे. त्यांना पाहूनच बालकवी म्हणतात,
सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती .
त्यामुळे श्रावण मास हा व्रतवैकल्यांचा काळ सणावारांचा काळ असे आपण नक्कीच म्हणू शकतो. श्रावणात सणांची रेलचेल असतेच, तर त्या अनुषंगाने विकसित झालेल्या खाद्यसंस्कृतीची ही अनेक रूप आपल्याला पाहायला मिळतात. अनेकांना ह्यामुळे डाएटचे वेध लागतात परंतु खवय्यांना मात्र कोणीच अडवू शकत नाही. नागपंचमीच्या दिवशी पातोळ्या, किंवा अळूचं गरगट, दूध -लाह्या गोकुळाष्टमीचा काल्याचा प्रसाद, नारळी पौर्णिमेचा नारळी भात किंवा वड्या , पोळ्याच्या दिवशी केलेल्या पुरणपोळ्या किंवा मंगळागौरीचा साजूक नैवेद्य ह्या सर्वांमुळे श्रावणाचं एक अनोखं रूप आपल्याला पाहायला मिळतं. ह्या पदार्थांची लज्जत काही औरच त्यामुळे डाएट सांभाळणे हा एक खडतर प्रवास असतो. तसं पाहायला गेलं तर हे सर्व पदार्थ सात्विक, पावसाळी ऋतूला साजेसे व वातावरणातील बदलानुसार शरीरासाठी पूरक असेच आहेत. त्यांना चाखल्याने नव्या निरोगी आणि सुदृढ जीवनशैली ची सुरुवात झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
अनेक पावसाळी रानभाज्या याच काळात मिळतात त्यातून विविध जीवनसत्त्व, लोह अगदी सहजपणे मिळते. अर्थात शहरी लोकांना ह्याबद्दल फारच कमी माहिती आहे परंतु गावाकडे मात्र मोठ्या प्रमाणात आजही या भाज्या खाल्ल्या जातात. आपल्या रोजच्या पालक, मुळा, मेथी यापेक्षा या वेगळ्या असतात चुका, चाकवत,कुर्डु, काटली, घोळू, रान केले,भारंगी, कुडा, मोरवा, काकवी , टाकळा,पेंढरा एक ना अनेक अशी बरीचशी नावे आपल्याला माहीतही नाहीत पण चवीबरोबरच औषधी दृष्ट्या सुद्धा या भाज्या कैकपटीने गुणकारी आहेत. जसं की काही किडनीच्या आजारांवर गुणकारी ठरतात तर काही शरीरातील लोह वाढवून रक्तप्रवाह सुरळीत करतात . अळू बरेचदा या मोसमात खाल्ला जातो. पावसाळी पाण्यामुळे होणारे पोटाचे विकार यामुळे होत नाहीत. या भाज्यांची लागवड निसर्गच करत असतो गावाकडच्या लोकांना परंपरागत ह्या सर्वाचा ज्ञान असतं. त्यांचे औषधी उपयोग ही माहीत असतात निदान त्यामुळे तरी या भाज्यांचा वारसा टिकला आहे असे म्हणायला हरकत नाही.
तर अशा या श्रावणाची अनेक रूपे बोलू तेवढे कमीच त्यामुळे हिरवागार झालेला निसर्ग म्हणजे श्रावण महिना, वेगवेगळे पदार्थ म्हणजे श्रावण महिना, सृष्टीचे समृद्ध रुप म्हणजे श्रावण महिना, ऊन-पावसाचा खेळ म्हणजे श्रावण महिना, व्रतवैकल्य ची सुरुवात म्हणजे श्रावण महिना, सणांची रेलचेल म्हणजे श्रावण महिना, श्रवणीय गोष्टी सांगणारा श्रावणमहिना, पर्यावरणाचे मोल अधोरेखित करणारा श्रावण महिना, हिरव्या श्रीमंतीने सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असा हा "ऋतू हिरवा ऋतू बरवा।।"
Comments
Post a Comment