विज्ञानाच्या वाटेवर...!
जय जवान !जय किसान !जय विज्ञान !
ही घोषणा म्हणजे भारताच्या प्रगतीचा मूलमंत्र आहे. जवान व किसान हे देशाचे दोन आधारस्तंभ आहेतच किसान पोटाची काळजी वाहतात ,तर जवान संरक्षणाची! भारताचे मा.जी पंतप्रधान कै. अटल बिहारी वाजपेयी यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या जय जवान! जय किसान !या उक्तीमध्ये जय विज्ञान! ही समर्पक भर घातली व त्यानुसार पोखरणच्या वाळवंटात कृतीही केली, आणि विज्ञान हा देखील भारताच्या प्रगतीचा एक आधारस्तंभ आहे हे सिद्ध केलं.
विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे .विज्ञानाने माणसाला चाकाचे रहस्य सांगितले, रथ, बैलगाडी ,आगगाडी, विमान अगदीच काय तर आता रॉकेटच्या सहाय्याने मानव अंतराळात चंद्रावर जाऊन पोचला. विज्ञानाच्या सहाय्याने अनेक खते संकरीत बी बियाणे आणि कृषी अवजारे शोधून त्याने कृषी उत्पादनातही प्रचंड क्रांती केली. विज्ञानाच्या सहाय्याने माणसाने आपले जीवनमानही वाढवले. असाध्य आजारांवर त्याने मात केली.एकूणच काय मानवाच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राला विज्ञानाने स्पर्श केला आहे.
अनेक महान शास्त्रज्ञांनी आपले योगदान यामध्ये दिले आहे. इसवी सन पूर्व 500 पासून विज्ञानाच्या वाटेवरून मानवाची पावले पडण्यास सुरुवात झाली. चरक, सुश्रुत, गॅलिलिओ, अरिस्टोटल पासून गेल्या अडीच हजार वर्षात आज पर्यंत अगणित असे शास्त्रज्ञ होऊन गेले.
सुरूवातीचा कालखंड सोडला तर पुढे भारतीयांचे या क्षेत्रातील योगदान दिसून येत नाही . भारतीय संस्कृती प्राचीन आहे तिला, पाच हजार वर्षांचा इतिहास आहे .संस्कृती आणि विज्ञान या दोन्हींचा विकास भारतात एकत्रित झालेला दिसून येतो. वैद्यकीय ,धातुशास्त्र ,रसायन यामध्ये केलेल्या संशोधनाचे पुरावे आजही पहायला मिळतात पण मध्यंतरीच्या कालखंडात मुघलांचे आक्रमण, इंग्रजांचे राज्य व कर्मकांडांचे प्राबल्य यामुळे भारतीयांची विज्ञानाच्या वाटेवर चालणारी पाउले थंडावली. परंतु पाश्चात्त्यांनी मात्र अनेक चकित करणारे शोध याच काळात लावले
भारतातील तंत्रज्ञान व विकासाची परंपरा याबाबत दोन टोकाचे विचार करणारे गट आहेत. त्यातील एका गटाचे म्हणणे असे की प्राचीन धर्मग्रंथात सर्व ज्ञान ठासून भरले आहे म्हणजेच जे शोध लागले ते सर्व भारतात पूर्वीच लागले होते. तर दुसरीकडे भारतामध्ये काहीच नव्हते अशी ही धारणा आहे. विचारांपेक्षा भावनांचा पगडा अधिक झाल्यामुळे ग्राह्य गोष्टींबरोबर अग्राह्य गोष्टींचा इतिहासात समावेश झाला आहे." गांधारीला शंभर पुत्र होते या महाभारतातील कल्पनेचा संबंध क्लोनिंगशी लावून हे तंत्रज्ञान भारतीयांना अवगत होते" यासारखी हास्यास्पद विधाने त्यामुळेच म्हटली गेली. परंतु सारासार विचार करून जे प्रयोगां करवी सिद्ध झाले आहे, ज्याचे प्रमाण आहे त्यावरच विश्वास ठेवणे नक्कीच सुज्ञ पणाचे. म्हणून भारतामध्ये सर्वच होते किंवा काहीच नव्हते अशी टोकाची भूमिका घेऊन काहीच साध्य होत नाही.
भारतातील शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये आजही जर पहिलं नाव घ्यायचं झालं तर ते सुश्रुत हेच असतं !ख्रिस्तपूर्व 600 -512असा सुश्रुतांचा काळ होता. शल्यचिकित्सक म्हणून आजही सुश्रुतांनची कीर्ती जगभर गाजते. प्लास्टिक सर्जरीचा मूलमंत्र सुश्रुतांनी दिला. वैद्यकीय शास्त्रासंबंधित त्यांनी विकसित केलेल्या उपचार पद्धती थक्क करणाऱ्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या "सुश्रुतसंहिते"वरून हे स्पष्ट होते. यामध्ये 1120 आजार ,700 औषधी वनस्पती आणि 64 क्षारांपासून केलेली औषधे व 57 प्राणिजन्य औषधांचा समावेश आहे. सुश्रुतांनी विकसित केलेल्या तंत्राचा अभ्यास इटलीमध्ये केला गेला. नाक तुटल्यामुळे आलेले व्यंग घालवण्यासाठी गालाच्या त्वचेचा वापर सुश्रुतांनी केला. पण मऊ कातडी वापरल्यामुळे ती टिकू शकली नाही त्यामुळे त्यांनी कपाळावरील त्वचेचा वापर सुरू केला. हे तंत्र आजही वापरले जाते. यातील कातडीच्या भागाला "इंडियन फ्लॅप" हीच संज्ञा वापरली जाते.
सुश्रुत यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदाना नंतर एकूणच जगात संशोधन थंडावले. इसवी सनानंतर सहाव्या शतकात भारतात संशोधन कार्य पुन्हा सुरू झाले. ज्यात गणित आणि आकाशातील ग्रह गोलांचे संशोधन आघाडीवर होते.
या गणित्यांमध्ये "आर्यभट्ट" हे प्रमुख होते. आजही आर्यभट्ट भारतीय खगोल शास्त्र आणि गणिति या परंपरेतील अर्ध्वयू मानले जातात. आर्यभट्ट यांच्या जन्मस्थाना बद्दल संभ्रम असला तरी उत्तर वायव्य पश्चिम महाराष्ट्र ते राजस्थान यादरम्यानचे ते असावे असे अश्मक प्रदेशावरून अनुमान काढले गेले आहे. आर्यभटानी अनेक ग्रंथ लिहिले. ज्यातील थोडेफार सध्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये "आर्यभटीय" याचा प्रामुख्याने समावेश होतो. यामध्ये बीजगणित, भूमिती, अंकगणित यांच्या संकल्पना नमूद केलेल्या आहेत.
त्यानंतर भारतीयांना आज पर्यंत ज्याचे निसंकोचपणे श्रेय दिले जाते असा शून्याचा शोध येतो. बाकी सारे काही कालानुसार विलिप्त झालेपण शून्य आजही आहेच! तर या शून्याचा शोध लावला "ब्रह्मगुप्ताने". मानवाने अंक शोधून व्यवहार चालू केला होता , पण त्या अंक प्रणालीला पूर्णत्व येत नव्हते. आर्यभटाने सांगितले की असा एक अंक आहे त्यामुळे ही मालिका पूर्ण होईल व ब्रम्हगुप्त यांनी त्यातून मार्ग काढला."ब्रह्मस्फूटसिद्धांत" या त्यांच्या ग्रंथात त्यांनी शून्याचा उपयोग कसा करावा याचे नियम दिले आहेत.
यानंतर भास्कराचार्य हे गणिती, नागार्जुना सारखे रसायन शास्त्रज्ञ होऊन गेले पण त्यानंतर मात्र काही शतकात भारतात नवीन कोणतेच शोध लागले नाहीत. भारताची अंतर्बाह्य परिस्थिती संशोधनास पूरक नव्हती. पाश्चात्त्यकरवी मात्र जगाला हलवून टाकतील असे शोध अगणित लागले.
आधुनिक भारताची पिढी शिक्षित झाल्यामुळे त्यांना गतवैभवाची जाणीव झाली व त्यांनी विज्ञानाची कास धरली. आधुनिक भारतातील शास्त्रज्ञांमध्ये रामानुजन,सर सी व्ही रमण ,सत्येंद्रनाथ बोस, जगदीश चंद्र बोस, शांतीस्वरूप भटनागर ,होमी भाभा ,विक्रम साराभाई ,ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी स्वातंत्र्यापूर्वी भारताच्या संशोधन कार्याची धुरा समर्थपणे पेलली.
महाराष्ट्रातील शास्त्रज्ञांबद्दल बोलायचं झालं तर जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, विजय भटकर यांची नावे प्रकर्षाने पुढे येतात.
सैद्धान्तिक, भौतिकशास्त्र , खगोलशास्त्र तसेच विश्वरचना शास्त्र यात डॉक्टर जयंत नारळीकर यांनी प्रमुख काम केले आहे. या विषयाशी निगडित विपुल प्रकारचे ग्रंथ, निबंध परिसंवाद ,व्याख्याने अशा गोष्टींचा पाठपुरावा करून नारळीकरांनी त्या या विषयांमधील संशोधन कार्य जागतं ठेवलं आहे. जगविख्यात असणारा "स्थिर -स्थिती सिद्धान्त" (कन्फॉर्मल ग्रविटी थिअरी) नारळीकरांनी फ्रेंड हाँयल यांच्यासोबत मांडला. त्याला "हॉयल -नारळीकर सिद्धांत" असेही म्हणतात. नारळीकर हे मूलभूत संशोधन कार्याला वाहून घेतलेले संशोधक आहेत. त्यांची विज्ञान कथा व इतर अनेक विज्ञान विषयक पुस्तके आहेत."आयुका" या त्यांनी पुण्यात स्थापन केलेल्या खगोलशास्त्र विषयक संस्थेला आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा दर्जा मिळाला आहे.
भारतीय संगणक शास्त्रात आपली मोहोर उठवणारा त्यांच्या यादीत सर्वात वरचं नाव येतं ते म्हणजे "डॉक्टर विजय भटकर". अत्यंत मान्यवर असा हा वैज्ञानिक महाराष्ट्रातल्या विदर्भ मधल्या मुरंबा या छोटेखानी गावात 1946 रोजी जन्माला आला. अमेरिकेसारख्या विकसित देशांनी भारताला अचानकपणे सुपर संगणक द्यायला नकार दिला आणि विजय भटकर यांचे नाव अजरामर होऊन गेलं. राजीव गांधी पंतप्रधान असताना सुपर संगणक बनवण्याचे तंत्रज्ञान अमेरिकेने अचानक पणे भारतीयांना द्यायचं नाकारलं आणि डॉक्टर विजय भटकर यांनी ,"आपण भारतीय शास्त्रज्ञही हे तंत्रज्ञान विकसित करू शकतो आम्ही आमच्या 'सी-डॅक' या संगणक विषयक तंत्रज्ञान केंद्रातही सुपर संगणक बनवू शकू" अशी ग्वाही पंतप्रधानांना दिलीआणि तसा महासंगणक त्यांनी बनवूनही दाखवला 1998 मध्ये अमेरिकेने भारताला संगणक तंत्रज्ञान द्यायला नकार दिला डॉक्टर भटकर यांनी 1998 मध्ये 'परम 8000'आणि 1999मध्ये' परम 10000' असे संगणक विकसित करून अमेरिकेचे आव्हान स्वीकारले. त्या क्षणापासून आजवर संगणकाच्या क्षेत्रात अमेरिकेलाही आज अनेक वर्ष भारतातल्या तरुण संगणक शास्त्रज्ञांच्या मदतीवर अवलंबून राहावं लागत आहे, हे विसरता येत नाही. याचं श्रेय नक्कीच डॉक्टर विजय भटकर यांना जात. सी-डॅक म्हणजे 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग'. पुणे विद्यापीठात एका टोकाला ही संगणक विषयक संशोधन करणारी संस्था कार्यरत आहे तर दुसर्या टोकाला डॉक्टर जयंत नारळीकर यांची आयुका ही खगोलशास्त्र विषयी संशोधन करणारी संस्था आहे.
त्यानंतर नाव घ्यायचं झालं तर येतात आयुष्यातली कमीत कमी बारा वर्ष अनवाणी पायांनी चालणारे रात्री सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारे आणि इतक्या हालाखीच्या परिस्थितीतूनही मार्ग काढून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून न्यूटनने ज्या पुस्तकात स्वाक्षरी केली आहे त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय डाँ. "रघुनाथ माशेलकर!"हळदीच्या पेटंटसाठी त्यांनी केलेली लढाई ही त्यांची खास ओळख आहे. हळदीचे आणि भारताचे नाते हे प्राचीन काळापासून आहे असे पुरावे असताना देखील एक दिवशी त्यांचे लक्ष वर्तमानपत्रातील एका बातमीकडे गेले,ज्यामध्ये अमेरीकेने हळदीवर स्वतःचे स्वामित्व हक्क सांगितले होते. भारतामध्ये पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या ज्ञानावर कोणी त्रयस्थ हक्क सांगत आहे हे माशेलकरांना रुचले नाही, त्यामुळे त्यांनी अमेरिकेविरुद्ध न्यायालयीन लढाई सुरू केली. हळदीवर लिहिले गेलेले अनेक श्लोक त्याचे गुणधर्म सांगणारे जुन्या ग्रंथातले अनेक पुरावे, सर्व संदर्भ , पाली भाषेतील हळदीचे संदर्भ सर्व काही गोळा केलं होतं. रघुनाथ माशेलकर अमेरिकेविरुद्ध ची ही हळदीची लढाई जिंकले .हळदी बरोबरच बासमती तांदूळ, कडुनिंब यासारख्या वस्तूंच्या पेटंट विषयीची लढाईही माशेलकरांनी लढली व ती जिंकून दाखवून त्रिखंडांमध्ये भारतीयांचं नाव गाजवलं. माशेलकर आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'रसायन अभियांत्रिकी तंत्रज्ञ इंजिनियर' आहेत. 'पोलिमर हा त्यांच्या संशोधनाचा खास विषय आहे. पॉलिमर विज्ञान आणि पेट्रोकेमिकल्स या विषयात त्यांनी 230 पेक्षा अधिक निबंध र्आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केले आहेत या विषयाशी संबंधित 20 पुस्तकांचे त्यांनी संपादनही केलं आहे.अशा या माशेलकरांच्या तीस वर्षाच्या कामाचे फलित म्हणजे भारतातल्या आणि जगातल्या ही एकंदर उद्योगधंद्याच्या वाढीसाठी लागणारे संशोधन विकसित करण्यात मोलाची भर घालणे.
पाहता क्षणी जी मंडळी हमखास केवळ वैज्ञानिक वाटतात अशा मंडळींमध्ये "डॉक्टर वसंत गोवारीकर" या वैज्ञानिक शास्त्रज्ञांचे नाव नक्कीच घ्यावे लागेल. तंत्रज्ञान विकासाचं बाळकडू प्राप्त झालेल्या या वैज्ञानिकाने वयाच्या केवळ तेराव्या वर्षी हेन्री फोर्ट या नामांकित मोटार उत्पादकांना मोटारीचा तंत्रज्ञान अवगत व्हावे म्हणून कोणत्या प्रकारची पुस्तके वाचावीत हे पत्र पाठवून विचारलं होतं. ह्या पत्राच्या संदर्भात हेन्री फोर्ड यांनी केवळ उत्तरच पाठवलं नाही तर त्यांना स्वखर्चानं त्या संदर्भातील पुस्तकही पाठवली होती.1965 पासून 'टाटा फंडामेंटल रिसर्च सेंटर' या संस्थेत विक्रम साराभाई या ज्येष्ठ वैज्ञानिकांबरोबर त्यांनी अग्निबाण संशोधन कार्य सुरू केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी पॉलिमर केमिस्ट्री चाही सखोल अभ्यास केला. ही प्रयोगशाळा मग केरळमधील थुंबा येथे गेली आणि 7000 शास्त्रज्ञांचे प्रमुख म्हणून गोवारीकर काम पाहू लागले. डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या नेतृत्वाखालीच slv-3 हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. जी भारताची एक महत्वाची कामगिरी होती.
असे एक ना अनेक थोर वैज्ञानिक ह्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मले ज्यांनी महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचं नावजगाच्या नकाशात मोठं केलं. म्हणुनच रोल मॉडेल व्हायला हवेत ते नारळीकर भटकर माशेलकर यांच्यासारखे शास्त्रज्ञ!!
अतिशय उपयुक्त माहिती आहे! ....खरच खूप छान लिहिले आहे ..!👍👌
ReplyDeleteThank you!
Delete👏👏
ReplyDelete