आम्ही सारे खवय्ये!
चांद्यापासून बांद्यापर्यंत चा महाराष्ट्र विविधतेने नटलेला, निसर्गाने परिपूर्ण, भाषा मराठीचं पण तिथेही अनेक पैलू मालवणी ,वऱ्हाडी ,कोकणी. पण या सगळ्याबरोबर प्रकर्षाने आठवण होते ती फक्त पोटाला नाही तर "आत्म्याला तृप्त " करणाऱ्या मराठी पदार्थांची. खवय्यांसाठी म्हणजेच foodie बरं का ! तर foodie लोकांसाठी ही एक देणगीच ! आता या पदार्थांबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं आपल्याकडे म्हटलंच आहे की "माणसाच्या मनातला रस्ता त्याच्या पोटातून जातो "म्हणजे जेवण हे फक्त उदरभरणाचे काम करते असा समज कोणाचा क्वचितच होत असेल. नाश्त्याच्या पोह्या पासून परिपूर्ण, सुग्रास अनेक खाद्यपदार्थांनी नटलेले जेवणाचे ताट! प्रत्येकाबद्दल बोलावे तेवढे कमीच प्रत्येक सणावाराची स्पेशल डिश ठरलेली आणि ती एवढी परफेक्ट कधी कधी तर शंका येईल की ह्या डिशेस वरूनच सणवार ठरवले आहेत की काय !!
अनेक पदार्थ हे प्रत्येक प्रांतात पिकणाऱ्या पिकावर अवलंबून असतात त्यामुळे प्रत्येकाची चव वेगळी. बरं प्रत्येक पदार्थांचा background सुद्धा ठरलेला आहे जसं की भजी खाण्याचं स्वर्गसुख हे पाऊस पडत असतानाच घेता येतं आणि सोबत चहा म्हणजे निव्वळ आहाहा !!!
हे पदार्थ समोर आले की डायट कॉन्शियस ना त्यांचा डाइट प्लान फॉलो करणे कठीणच !करतीलच कसे? पदार्थांच्या सुगंधानेच, पोट भरलेल्याचीही भूक चाळवते तर diet च काय घेऊन बसलात?
पु.लं. म्हणतातच" जठराग्नीला भरपूर आहूती पडल्या पाहिजेत. सारी मराठी संस्कृती ही खाण्याभोवती गुंतली आहे, होळीतून पोळी काढली, दिवाळी मधून फराळ वगळला तर काय उरते ? कोजागिरीला केशराचं आटीव दुध वगळलं तर उरेल फक्त जागरण ! गणेश चतुर्थीला 'मोदक' मिळणार नसतील तर आरत्या कुठल्या भरवशावर म्हणायच्या? संक्रांतीच्या भोगीला जोवर तीळ लावलेली भाकरी (सध्या दुर्मिळच) वांग्याचे भरीत आणि तीळगूळ आहेत तोवरच लोक गोड गोड बोला म्हणतील!!रामनवमीच्या सुंठवडा, कृष्णाष्टमीच्या दहीलाह्या, दत्ता पुढले पेढे हेच वगळलत तर जेवण नसलेल्या लग्नाच्या पंगतीत बसल्यासारखं व्हायचं!" असे हे पु. लं. चे बोल त्यांचेच शब्द खरे करून दाखवतात.खरचं! मराठी संस्कृती खाण्याभोवतीच गुंतलेली आहे!
लग्नाच्या जेवणाबद्दल ग. दि.मां.नी तर कविताच रचली आहे जी वाचताना खवय्यांच्या रसना जागृत झाल्याशिवाय राहत नाहीत. गदिमा एकदा लग्नाला गेले होते जेवणाची पंगत वाढणं चालू होतं , पानात जसजसा एकेक पदार्थ येत गेला तस तसा त्या पदार्थाला गदिमांनी कवितेत बसवलं कवितेचं नाव होतं "काय वाढले पानावरती!"
काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती
धवल लवण हे पुढे वाढले मेतकूट मग पिवळे सजले
लवण म्हणजे मीठ पानात सर्वात आधी तेच वाढतात. तर मेतकूट म्हणजे मेथी व काही त्याच प्रकारच्या धान्याची केलेली पूड . मेतकूटला सर्वात मानाचे स्थान आहे ते मऊ भातासोबतच ! आजही ब्राह्मणी घरातली सकाळची न्याहारी ही मऊभात , लोणच्याची फोड व मेतकूट हीच आहे आणि हे त्रिकूट म्हणजे निव्वळ अप्रतिम!
"आले लोणचे बहु मुरलेले, लिंबू कागदी रसलेले
किसून आवळे मधुर केले
कृष्णा काठचे वांगे आणिले, खमंग त्याचे भरीत केले
निरनिराळे चटके नटले चटण्यांचे बहु मासले
संमेलनची त्यांचे भरले
मिरची खोबरे ती सहओले, तीळ भाजुनी त्यात घातले
कवठ गुळाचे मिलन झाले पंचामृत त्या जवळी आले
वास तयांचे हवेत भरले अंतरी अण्णा अधीर जाहले"
लोणची!! आंबा ,लिंबू, मिरची यांना तेल मसाल्यात मुरुवुन केलेल्या लोणच्याचे महत्त्व हे डाळ भातासोबत खातानाच कळते! शिवाय चटण्या! तोंडीलावणे असे त्यांना म्हणत असले तरी अनेक पदार्थ त्यांच्याशिवाय अपूर्णच. कवठ नावाचे फळ गणपतीला आवडते, त्याच्यासोबत गुळाचा केलेला संगम हा वाखाणण्याजोगा!
"भिजल्या डाळी नंतर आल्या काही मोकळ्या काही वाटल्या काही वाटुनी सुरेख तळल्या
कोशिंबिरीच्या ओळी सजल्या
शुभ्र काकड्या होत्या किसल्या
मुळा कोवळा मिरच्या ओल्या"
आंबेडाळ, पाटा-वरवंटा त्यावर वाटलेली भरड चणाडाळ ,अगदीच लांब कशाला तर पुरण हासुद्धा डाळीचाच एक प्रकार, पूर्वीच्या परिपूर्ण जेवणात यांचा वापर सहज असायचा. कोशिंबीर तर सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय foodies पासून diet conscious पर्यंत.
" केळी कापून चकत्या केल्या
चिरून पेरूच्या फोडी सजल्या
एक रुप त्या दह्यात झाल्या"
हे त्यावेळचे फ्रुट कस्टर्ड! नाव बदललं पदार्थ तोच!!
"भाज्या आल्या अळू घोसाळी रान कारली वांगी काळी
सुरण तोंडली आणि पडवळ
चुका चाकवत मेथी कवळी चंदनबटवा भेंडी कोवळी"
या सर्व रानभाज्या आहेत, त्यातल्या अनेक आपल्याला माहित सुद्धा नाहीत पण आजही गावाकडे या सर्रास खाल्ल्या जातात.
"फणस भोपळा हिरवी केळी
काजूगरांची गोडी निराळी
दुधीभोपळा आणि रताळी किती प्रकारे वेगवेगळी"
उन्हाळा आणि फणसाची भाजी नाही ??छे छे! कोणत्याही कोकणी माणसाला पटण्यासारखं नाहीच हे !फणसासोबत काजूगरही आलेच !ओल्या काजूगराच्या उसळीची बरोबरी मात्र कशाशीच होऊ शकत नाही.
"फेण्या पापड्या आणि सांडगे कोणी आणुनी वाढी वेगे"
तोंडी लावण्यांच्या या प्रकाराचा एक वेगळाच swag आहे. तो तेव्हापासून अगदी आत्तापर्यंत तसाच आहे
"गवल्या नखुल्या धवल मालत्या
खिरी तयांच्या शोभत होत्या
शेवयांच्या मग खिरी वाटल्या'"
आत्ताच्या लग्नाच्या जेवणात मध्ये गुलाबजाम जिलेबी असल्या तरी पूर्वी खीरींचे ते अढळस्थान होते. जिलेबी आणि मठ्ठाची असलेली दिलजमाई मात्र खूप जणांचाweak point आहे हे मात्र नक्की
"आमट्यांनी मग वाट्या भरल्या
सार गोडसे रतांब्याचे भरले प्याले मधुर कढीचे
कणीदार बहु तूप सूगंधी भात वाढण्यात थोडा अवधी"
अशा ह्या साग्रसंगीत पंगतीतल्या जेवणामधले कणीदार तूप हे तर cherry on the cakeअसंच म्हणता येईल.
अशा पदार्थाने परीपूर्ण ताटाला बघून कोणाच्याही तोंडून सहज निघणारच की "अन्न हे पूर्णब्रह्म!"
बाकी खाद्यसंस्कृती बद्दल आणि काय बोलायचं! नाश्त्याचे पोहे त्यातूनही ते नागपूरचे स्पेशल तर्री पोहे असतील तर व्वा!! अजून खाल्ले नाहीत पण जेवढे त्याबद्दल ऐकले त्यावरून एवढं तर नक्कीच म्हणू शकते.
"मिसळ" हिच्याबद्दल बोलायला शब्दच नाहीत !प्रत्येक जिल्ह्याची आपली अशी स्पेशल मिसळ आहे कोल्हापुरी ,नागपुरी ,नाशिक, पुणेरी एवढेच काय तिथल्या तिथल्या मिसळी मध्येही वादच जसं की मामा काणे मिसळ ,मामलेदार मिसळ ,आस्वाद मिसळ.सगळ्याच एकापेक्षा एक! पण प्रत्येकाचीच मिसळ ही ऑल टाइम फेवरेट!
गोडाच्या पदार्थांमध्येही महाराष्ट्र अग्रगण्यच आहे !!कसा नसणार?? ज्यांच्याकडे पुरणपोळी आणि मोदक आहेत ते मागे असतीलच कसे? मातोश्रींच्या(आईच्या) हातच्या कापसासारख्या मऊसूत पुरणपोळ्या खाल्ल्या की बास!!सारं काही इथेच थांबावं आणि ही पुरणपोळी तोंडात अशीच विरघळत राहावी. ह्या पुरणपोळीचं एक वेगळच पण हटके अस रूप हल्लीच मला कळलय थँक्स to bha2pa (युट्युब चॅनेल) "पुरणपोळी आईस्क्रीम" व्हिडिओच बघितलाय पण बस wow! एवढच! यातच सारं काही आलं,
आणि मोदक! त्याला कोण विसरणार उकडीच्या, कळीचा तांदळाच्या पिठाच्या मध्ये नारळ खोबऱ्याचा चुन आणि त्यावर तुपाची धार समोर आल्यावर कोणी नाही म्हणू शकत नाही आणि अनेक गोड पदार्थ आहेतच श्रीखंड पुरी आणि आमरस पुरी यांचे नाते दृढच ,त्याचप्रमाणे खीरी ही आहेत पण वरच्या स्थानी पुरणपोळी आणि मोदकच!
तर अशी ही मराठमोळी खाद्यसंस्कृती अन्नाला देव मानते कारण ते आहे म्हणूनच सजीवसृष्टी आहे याची जाणीव करून देते ,उन्हात राबणाऱ्या शेतकऱ्याला ठेचा भाकरीच्या रूपात आधार देते ,प्रत्येक सणाचा गोडवा वाढवते ,रोज खंबीर पणे जगायचे बळ देते आणि खवय्यांच्या जिभेचे चोचले ही पुरवते!!
Exquisite
ReplyDeleteThank you!
DeleteWooow.. लय भारी
ReplyDeleteधन्यवाद
Delete