लख लख चंदेरी तेजाची...

                       लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
                    झळाळती कोटी ज्योतीया ssss
 चित्रपट!! रुपेरी पडद्यावरची एक लखलखती, चमचमती दुनिया . चित्रपट हा समाजाचा आरसा असतो! असतो? की होता ?असो!! 
भारतात आजतागायत दररोज कोट्यावधी प्रेक्षक चित्रपट बघतात.  गेली तीस वर्ष भारताचा चित्रपट निर्मितीत संख्येने पहिला क्रमांक आहे. जवळपास 110 देशात भारतीय चित्रपट दाखवले जातात. लाखो लोकांची ही उपजीविका आहे एवढंच कशाला आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची ही एक भक्कम पायरीच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

खरं पाहायला गेलं तर चित्रपट कला भारतीयांना पाश्चात्त्यांकडून मिळाली व भारतीयांनी स्वतःच्या तंत्रकुशलतेने तीला मोठी केली. पुरातन काळी भारतात छाया- नृत्याचे प्रयोग केले जाता. दिव्याच्या प्रकाशाच्या सहाय्याने मध्यभागी लावलेल्या पडद्यावर त्यांची हालचाल छाया स्वरूपात दिसे. चीन-जपान मध्येही हा प्रयोग अस्तित्वात होता पण आपल्याकडील छाया नृत्याला कथा व संवादाची जोड होती.  हा प्रयोग चलचित्रासारखाच वाटे. अठराशे एकोणनव्वद साली ब्रिटिश संशोधक 'विल्यम फ्रिज ग्रीन' याने फिल्म चित्रीकरण करता येईल असा कॅमेरा तयार केला. तर एडिसनने कायनोटग्राफी व कायटोनोस्कॉपी ही स्वतंत्र यंत्रे तयार केली.  हॅंडल फिरवून चित्रांची हालचाल यामुळे बघता येऊ लागली पण ह्या यंत्राच्या  छिद्रातून एकावेळी एकालाच पाहता यायचं. परंतु चित्र हलतयं हेच त्यावेळी खूप होतं !!

त्याच वर्षी भारतात एक वेगळाच यशस्वी प्रयोग चालू होता. रेल्वेत नोकरीला असणारे कल्याणचे 'श्री महादेव गोपाळ पटवर्धन 'यांनी हौस म्हणून श्रीकृष्ण चरित्रातील काही भाग स्लाईड्सवर रेखाटला व ह्या स्लाईड्स ते मॅजिक लँटरच्या सहाय्याने दाखवित.  त्यामुळे चलतचित्र बघितल्याचा भास होई.त्यांचा थोरला पुत्र 'विनायक' व धाकला पुत्र 'रामचंद्र' यांनी काचेच्या स्लाइड्‍सवर सुरेख व सुबक चित्र काढून त्यांच्या चलते चित्रपट बनवायची कला आत्मसात केली, व पटवर्धन बंधूंनी स्‍लाईड्सवर स्वतः रंगवलेल्या चित्रांचे, पौराणिक कथेवरील आधारित कार्यक्रम दाखवायला सुरुवात केली ही चित्रे अतिशय रेखीव ,आकर्षक व प्रमाणबद्ध असत. अमरकोशातून योग्य शब्द निवडून त्यांनी या खेळाला "शांभारिक खरोलीका" असे नामकरण केले होते एक प्रयोग जवळ जवळ तीन तास चाले. त्यांनी चित्रांबरोबरच संवाद, संगीत, गाणी व निवेदन यांचीही जोड दिली होती.  याची लोकप्रियता जवळजवळ तीस वर्षापर्यंत होती.

पुढे एडिसनने केलेला विटास्कोप,  ल्युनिए बंधूंनी बनवलेली चित्र प्रक्षेपणाची यंत्रे असे एक ना अनेक शोध लागून ह्या क्षेत्राची प्रगतीकडे वाटचाल होतच राहिली. 
महाराष्ट्रात  'हरिश्‍चंद्र भाटवडेकर' तथा 'सावेदादा'  हे चलतचित्रपट पाहून प्रभावित झाले व आपणही त्याचा व्यवसाय करावा असे त्यांना वाटू लागले. हा विचार पक्का झाल्यावर सावेदादांनी इंग्लंड वरून चलतचित्रपटा साठी लागणारी सामग्री मागवून घेतली व तिचे प्राथमिक तांत्रिक शिक्षण घेतले.  मुंबईतल्या हँगिंग गार्डनमध्ये पुंडलिक व कृष्णा न्हावी या पहेलवानांच्या कुस्तीचे चित्रिकरण केले.  परदेशातून त्यावर प्रक्रिया करून आणण्यात आली व 1899 मध्ये भारताचा स्वतःचा असा लघुपट तयार झाला आणि सावेदादा हे भारतीय चलतचित्रपट स्रुष्टी चे आद्यप्रवर्तक ठरले.
पुढे सावे दादांनी आपला कॅमेरा ए. पि. करंदीकर, वि.  दिवेकर व एस. एन. पाटणकर यांना विकला. या तिघांनी भागीदारीमध्ये मिळुन "सावित्री" हा पौराणिक चित्रपट काढायचे ठरवले. 1912 सालातली ही घटना आहे.  हा चित्रपट पूर्णही झाला परंतु या मूकपटात अनेक तांत्रिक चुका होत्या,  तसेच प्रोसेसिंग मध्येही घोटाळा होता त्यामुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही. याच वेळी कलकत्त्यामध्ये ही 'बिल्वमंगल' या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले होते परंतु भांडवलाअभावी तो चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. 
भारतातील पहिला चित्रपट 18 मे 1912 थेटर मध्ये झळकला तो होता "श्री पुंडलिक" त्याची निर्मिती केली तेव्हा "दादासाहेब तोरणे" अवघे बावीस वर्षांचे होते.मुळच्या  मालवणातल्या दादासाहेबांनी मुंबईत बाबुराव पै यांना सोबत घेऊन 'फेमस पिक्चर' चित्रपट वितरण संस्था स्थापन केली . श्री पुंडलिक हे प्रथम नाटक होतं त्याचं दादासाहेबांनी चित्रीकरण केलं होतं पण त्याकाळी वितरण संस्था नसल्याने पुंडलिक फक्त मुंबई मध्येच प्रदर्शित झाला.  त्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली नाही. शिवाय यात 'नवीन' याखेरीज उल्लेखनीय असं काही नव्हतं, चित्रपटाचं तंत्र नव्हत,  नाटकाचं चित्रीकरण केलेलं होतं म्हणून  तो स्मरणात राहिला नाही.
यानंतरही भारतात चित्रीकरणाचे काही प्रयत्न होऊन गेले परंतु या ना त्या कारणामुळे ते फसलेआणि भारतीय चित्रपट सृष्टीच्या जनकत्वाचा मान त्र्यंबकेश्वराच्या "दादासाहेबांना" म्हणजे 'धुंडिराज गोविंद फाळके' यांना मिळाला.
दादासाहेबांनी संस्कृत पंडित होऊन आपला पेशा पुढे चालवावा अशी त्यांच्या वडिलांची इच्छा असली तरीही दादासाहेबांची मनीषा मात्र चित्रकार होण्याची होती. 1890 मध्ये बडोद्याच्या सुप्रसिद्ध कलाभवनामधून 'ऑइल पेंटिंग' व 'वॉटर कलर' ह्याचे शिक्षण घेऊन दादासाहेब बाहेर पडले व त्याच वर्षी त्यांनी एक छायाचित्रणासाठी कॅमेरा खरेदी केला . पुढे दादासाहेबांनी फाळके फोटो स्टुडिओ, नाटकाचे दिग्दर्शन ,शास्त्रोक्त संगीत, नाटकांमध्ये अभिनय, जादूच्या कला, पुरातत्व विभागाचे छायाचित्रकार, एनग्रीविंग आणि प्रिंटिंग वर्क्स असे एक ना अनेक उद्योगधंदे व नोकऱ्या केल्या व प्रत्येकामध्ये आपले अव्वल स्थान  सिद्ध करून दाखवले. या सर्वाचा उपयोग त्यांना पुढे चित्रपट करतेवेळी झाला, पण  कलात्मक दृष्टी असलेल्या दादासाहेबांचे धंदेवाईक दृष्टी असणाऱ्या भागीदाराशी जमेना, त्यामुळे त्यांनी सर्व उद्योग धंदे सोडून दिले.
इंडोवेस्टर्न तंबूत  त्यावेळी  चलतचित्रपट दाखवले जात. दादासाहेब आपली पत्नी सरस्वतीबाई यांच्या सोबत 'लाइफ ऑफ खाईस्ट' हा चित्रपट पाहायला गेले. तो पाहत असताना त्यांच्या लक्षात आलं की चित्रपट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे भारतीय संस्कृती जगासमोर आणण्याचे ! आपल्याकडे हवी तेवढी पौराणिक .ऐतिहासिक. सामाजिक व रंजक कथानकं आहेत ती पडद्यावर आली पाहिजेत, आणि झालं '15 एप्रिल 1911'हा दिवस भारतीयांच्या पर्यायानं चित्रपट सृष्टीच्या इतिहासात क्रांतिकारक दिवस होता. कारण खुद्द दादासाहेबांनी स्वतः हा व्यवसाय सुरू करायचं मनावर घेतलं.  दादासाहेबांनी लंडनमध्ये जाऊन चित्रीकरणाचे प्राथमिक तांत्रिक शिक्षण घेतले व भारतात येऊन सरस्वती बाईंना त्याचे त्याचे धडे दिले. चित्रण करण्यासाठी लागणारी सामग्री त्यांनी लंडन वरुन मागवली. एक जर्मन प्रोजेक्टरही दादासाहेबांनी आणला. घरीच डार्करूम व फिल्मवर प्रोसेसिंग करण्याची प्रक्रिया याची तयारी करून ठेवली होती. चित्रपटासाठी नेपथ्य ,लेखन व वेशभूषेची स्केचेस ही सर्व कामे दादासाहेबांनी केली पण सर्वात मोठा प्रश्न होता ते म्हणजे भांडवल!! आणि आपल्याकडे चमत्काराशिवाय नमस्कार नाही. त्यामुळे दादासाहेबांनी एक शक्कल लढवली. एका कुंडीत वाटाण्याचे बी पेरले व त्यासमोर केसालाही धक्का लागणार नाही अशा स्थितीत कॅमेरा ठेवलाआणि 'वनटर्नवन ब्लॉक'  अशा पद्धतीने त्याचे चित्रीकरण सुरू केले.  जवळ जवळ महिनाभर हे चित्रीकरण सुरू होते व सवा मिनिटाच्या लघुपटामध्ये बीजापासून वेलाचे रूपांतर होताना दिसले. हा यशस्वी प्रयोग पाहून दादासाहेबांना अनेकांनी कर्जाऊ रक्कम दिली व भांडवलाचा प्रश्न मिटला. 
पुढे अभिनयातली पात्रे. लागणारा नोकरदार वर्ग, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, कलाकारांची वेशभूषा, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव व अभिनयाचे धडे,छायालेखन, दिग्दर्शन,संकलन,  फिल्म प्रोसेसिंग, असे एक ना अनेक अडथळे दादा साहेबांपुढे आले आणि शेवटी सहा महिने 27 दिवसानंतर 3700  फुटाचा म्हणजेच चार रिळांचा पहिला वहिला, भारतीय मूकपट, "राजा हरिश्चंद्र" शनिवार 3 मे 1913 रोजी कोरोनेशन थेटर मध्ये प्रदर्शित झाला!
"राजा हरिश्चंद्र" चा बराच बोलबाला झाला.  पहिल्या प्रयोगापासूनच थेटर भरगच्च भरून जाऊ लागलं,  एकूण तेवीस दिवस सलग चालून राजा हरिश्चंद्र ने विक्रम केला. नंतर दादासाहेबांनी "हिंदुस्तान फिल्म कंपनी" सुरू केली व तिच्याद्वारे लंकादहन, श्रीकृष्ण जन्म,  कालियामर्दन, मोहिनी भस्मासुर, सत्यवान-सावित्री असे एकूण 46 चित्रपट काढले. 

फाळके नंतर 'बाबूराव पेंटर' यांची "महाराष्ट्र फिल्म कंपनी" 'नानासाहेब सरपोतदार' यांची "आर्यन फिल्म कंपनी" आणि 'प्रभात फिल्म कंपनी' अशा अनेक कंपन्या होऊन गेल्या. प्रत्येक कंपनीने एकापेक्षा एक सरस मूकपट पडद्यावर आणले.
बाबुराव पेंटर"  हे या प्रभावळी मधलं एक मानाचं नाव. त्यांनी 1917 रोजी "महाराष्ट्र फिल्म कंपनीची" स्थापना केली आणि 1919 मध्ये "सैरंध्री" या आपल्या कलात्मक मुकपटाची निर्मिती केली.  कल्पकता, भव्यता आणि स्त्रियांनीच केलेली भूमिका अशी वैशिष्ट्ये असणाऱ्या सैरंध्री ला खुद्द 'लोकमान्य टिळकांनी', "सिनेमा केसरी" या उपाधीने गौरवले.ह्या  कंपनीने एकूण 17 चित्रपटांची निर्मिती केली.  भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया दादासाहेब फाळके यांनी घातला तर त्याला कलात्मक शिस्त व सौंदर्य बाबुरावांनी दिले. 
1919 साली कोल्हापूर येथे "प्रभात फिल्म" कंपनीच्या स्थापनेमुळे चित्रपट सृष्टीच्या सुवर्णयुगाला प्रारंभ झाला. बाबुरावांच्या तालमीत तयार झालेल्या "व्हि. शांताराम"  यांच्या दिग्दर्शनाखाली या कंपनीने अनेक मूकपट तर काढलेच पण 1932 साली बोलपटा चा मुहूर्त ठरलेला "अयोध्येचा राजा"  हा चित्रपट काढून चित्रपट सृष्टीला नवीन पाउलवाट दाखवली. या शिवाय बायपँक पद्धतीने
"सैरंध्री" हा पहिला रंगीत बोलपट तयार केला.  बालगंधर्व यांची प्रमुख भूमिका असणारा 'धर्मात्मा' (हिंदी महात्मा) तर 'अमरज्योती' हा दर्यावर्दी जीवनाची पार्श्वभूमी असणारा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. 

पार्श्वप्रक्षेपण, पार्श्वगायन हे त्यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य होते. संत तुकाराम, कुंकू, माणूस,  शेजारी हे सामाजिक आशय, अत्यंत प्रभावीरीत्या प्रकट करणारे त्यांचे चित्रपट खूप लोकप्रिय ठरले.
दादासाहेब फाळके यांनी सुद्धा गंगावतरण हा बोलपट काढला.

1942 ला व्हि. शांताराम यांनी "राजकमल कला मंदिर"ची स्थापना केली. शाकुंतल या पहिल्या चित्रपटापासून सुरवात करून पुढे एकापेक्षा एक सरस अशा चित्रपटांचा खजिना त्यांनी प्रेक्षकांना दिला. त्यांनी दिग्दर्शित केलेला 'अमर भूपाळी' हा  चित्रपट अजरामर झाला.  याशिवाय पिंजरा,दो आखे बारा हात, गीत गाया पत्थरोने, स्त्री असे  हिंदी मराठी चित्रपटही प्रचंड गाजले. 
यांच्यानंतर पुढे एकूणच चित्रपट सृष्टीची प्रगती उत्तरोत्तर होत गेली अशा या दिग्गजांमुळे फक्त मराठीचं नाही तर भारताच्या चित्रपट सृष्टीला सोन्याचे दिवस आले. कॅमेऱ्याने फोटो काढला की अंगातली शक्ती खेचली जाते असा समज असणारी माणसे या दुनियेत येण्यासाठी जिवाचे रान करू लागली. आत्ताच्या घडीला या सर्व पार्श्वभूमीचा लवलेशही चित्रपट सृष्टी मध्ये दिसत नाही.  यापैकी अनेकांची नावे ही कित्येक जणांना माहीत नसतील. पण त्यांचे परिश्रम, चिकाटी , हातात भांडवल नसतानाही काही करून दाखवण्याची जिद्द या सर्वामुळे चा आज चित्रपटसृष्टी एका वेगळ्याच उंचीवर दिमाखात उभी आहे हे नाकारता येणार नाही.

Comments

Popular posts from this blog

मराठी माणुस

सुंदर साजिरा श्रावण आला!

विज्ञानाच्या वाटेवर...!