जयोस्तुते -The unsung part!
जयोस्तुते जयोस्तुते श्री महन् मंगले शिवास्पदे शुभदे ।
स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे यशोयुतां वंदे।
ओळी ऐकतानाच भान हरपून जाते. स्वातंत्र्य !!शब्दातच सारं काही आलं जगण्यासाठी सर्वात महत्त्वाचं जर काही असेल तर ते स्वातंत्र्य! वर्षानुवर्षे इंग्रजांशी झगडल्यावर, शेकडो प्राणांच्या आहुती दिल्यावर , आपल्या स्वतंत्र भारताचा , आपल्या भारत मातेचा , राष्ट्रध्वज नभात फडकत असताना समस्त भारतीयांच्या अंगावर उठलेल्या रोमांच्याची , त्यांच्या डोळ्यांमधून वाहणाऱ्या आनंदाश्रूंची जाणीवच आपल्या आपल्याला स्वातंत्र्यवीर वि .दा. सावरकर त्यांच्या या गीतातून करून देतात. गीतामधलं यशोयुता वंदे यशोयुता वंदे हे वरच्या पट्टीत म्हणत असताना उर गलबलून येतो, भरून येतो आणि यातूनच प्रतिभावंत लेखनशैलीची पोचपावती मिळत असते .स्वातंत्र्यवीर "वि .दा .सावरकर" हे वकील होते थोर देशभक्त होते क्रांतिकारक होते त्याचबरोबर कवीही होते!
सावरकरांनी त्यांच्या महाविद्यालयात , रत्नागिरी व अंदमानच्या काळकोठडीत अनेक कविता रचल्या.ज्यातील फारच थोड्या आपल्याला माहीत आहेत
त्यांच्या अनेक कविता इतिहासात विलीन झाल्या आहेत. अंदमानला काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरांनी त्यांच्या तुरुंगाच्या भिंतीवर काट्याने काव्य लिहिले होते. दिवसभर काथ्याकुट ,घाणा चालवणे अशा शिक्षा भोगून झाल्यावर रात्री केवळ मनाची विश्रांती म्हणून सावरकर भिंतीवरच काव्यरचना करत असत. एक ना अनेक अशा अनेक दर्जेदार कवितांची रचना त्यांनी तिथे केली .याच काळकोठडीत सावरकरांनी "कमला "सारख्या अतिशय सुंदर महाकाव्याची रचना केली. एक दिवस त्यांचा जेलर "बँरी" ह्याने हे पाहिले रागात त्याने जेलच्या सर्व भिंती रंगवून घेतल्या. केलेल्या सर्व कविता मिटुन गेल्या.विजयी हास्य करत तो सावरकरांकडे पाहू लागला तेव्हा ते त्याला म्हणाले धन्यवाद, तसही आता लिहायला जागाच उरली नव्हती , पाटी कोरी करून दिलात!!तर असेहे स्वातंत्र्यवीर सावरकर ! विविध अलंकारांचा चपखलतेने वापर , शब्दलालित्य , भावोत्कटता , माधुर्य, वैचारिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सर्वांमुळे अगदी सहजतेने सावरकरांच्या साहित्याला वेगळेपण प्राप्त होते.
।तुजसाठी मरण ते जनन ।
तुझ्यासाठी म्हणजे भारत मातेसाठी आलेले मरण हा माझा नवीन जन्मच आहे.
।तुजविण जनन ते मरण ।
तर तुझ्या विना तुला सोडून माझा झालेला जन्म हे माझे मरणं आहे.
जयस्तुते च्या प्रगल्भतेची जाणीव करून देणारी आणखी दोन कडवी अनेकांपासून नामानिराळी आहेत. ही कडवी स्वा. सावरकरांनी हिंदुस्थानातून वाहत असणाऱ्या, पण नंतर पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळणाऱ्या, सिंधू नदीला उद्देशून लिहिलेली आहेत. मूळ कथा अशी की स्वातंत्र्यापूर्वी भारत-पाकिस्तान हा एकच प्रांत होता, त्यांच्यातून वाहणारी नदी सुद्धा एकच सिंधू नदी होती. पुढे फाळणीनंतर म्हणजेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर,सिंध प्रांत पाकिस्तानात गेला सोबत सिंधू नदीला घेऊनच! पाकिस्तानात याच नदीचे नामकरण इंडस असे झाले. पुढे कराची मध्ये वाहून ती अरबी समुद्राला मिळते. तिच्याबद्दल लिहिताना सावरकर म्हणतात,
हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रिडा तेथे करण्याचा कां तुला वीट आज आला
होय आरसा अप्सरसांना सरसे करण्याला
सुधा धवल जान्हवी स्रोत तो कागे त्वा त्यजिला
वंदे त्वामहम् यशोयुतां वंदे यशोयुतां वंदे
सिंधू नदी हिमालयात उगम पावते, तो हिमालय ज्याचा लोभ खुद्द शंकराला ही आहे तर अशा या हिमालयात क्रीडा करण्याचा तुला आज का वीट आला आहे? त्याला का तू कंटाळली आहेस ?असे सावरकर विचारत आहेत!अप्सराही ज्याचा आरसा म्हणून वापर करतात असा हा हिमालय आहे . अशा जान्हवी चा स्त्रोत असणाऱ्या हिमालयाचा त्याग तु का बर केलास?
स्वतंत्रते या सुवर्ण भूमीत कमती काय तुला
कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजे वेणीला
ही सकल श्री संयुता आमुची माता भारती असतां
का तुवा ढकलुनी दिधली
पूर्वीची ममता सरली
परक्यांची दासी झाली
जीव तळमळे का तू त्यजिले
उत्तर याचे दे
स्वतंत्रते भगवती
स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे
तिची मनधरणी करताना सावरकर म्हणतात, की या भारत भूमी मध्ये तुला अशी काय कमी आहे? हवतर कोहिनूरचे पुष्प (कोहिनूर हिरा) तू तुझ्या वेणीत माळायला रोज घे!
सकल श्री संयुता आमची भारत माता असताना तू तिला दूर का लोटलं? पूर्वीची तुमच्यातली ममता कशी काय सरली?तुझ्या अशा वागण्याने आमचा जीव तळमळतोय त्यामुळे तूच आता याचे उत्तर दे!
असे हे सावरकर व त्यांचे अजरामर साहित्य त्यांच्या प्रत्येक साहित्यात त्यांच्या आचारांची, विचारांची, देशावरील प्रेमाची प्रकर्षाने जाणीव होत असते.
आजच्या पिढीला, या साहित्याबद्दल माहीत असण्याची शक्यता जरा कमीच म्हणूनच केलेला हा छोटासा प्रयत्न आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना त्रिवार अभिवादन!
Comments
Post a Comment