स्विकारून ही नमने सुमने!

                         स्वीकारूनही नमने सुमने
                                आशीर्वच् द्यावा 
                               नमोस्तुते गुरुदेवा।
आषाढ सुरू झाला आणि धुवाधार बरसणाऱ्या वरुणाने गुरुपौर्णिमेची चाहूल दिली.  गुरु- शिष्य या नात्या बद्दल लिहिण्यासारखे जरा कठीणच!  गुरु म्हणजे नेमकं काय? आणि शिष्य म्हणजे नेमकं काय ? गुरु म्हणजे जो शिकवतो आणि शिष्य म्हणजे तो शिकतो बस एवढेच? कदाचित जो शिकवतो तो शिक्षक,  पण गुरु हा शिकवण्यापेक्षा बर्‍याच प्रकारचे ज्ञान देऊन जातो.  जे शब्दात मांडणं जरा अवघडच!  गुरू जीवनाचा मार्गदर्शक असतो, शिष्याला सन्मार्गावर नेतो, विविध विषयांची सखोल माहिती, शास्त्रांचे ज्ञान देतो. शिष्याला अंधकाराकडून प्रकाशाकडे जाण्याचे सामर्थ्य देतो. आपल्या सहवासाने, प्रेमाने, स्पर्शाने, भावनिक, वैचारिक जवळीकीने शिष्याचे ज्ञानचक्षु उघडतो. कधी शिक्षक म्हणून मार्गदर्शन करतो कधी मित्र म्हणून सोबत करतो तर कधी वाटाड्या होऊन जीवनाचा योग्य मार्ग दाखवतो.
        
                   आजवरी अती परिचय होऊन 
                    तुम्हास प्रिय मित्रा सम मानून
       कधी अवज्ञा कधी अनादर अजाणतेपणी घडला
       क्षमस्व गुरुवर्य क्षमा असावी मनात राग नसावा ।

"व्यासोच्छिष्टं जगतू सर्वम "असा ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो त्या व्यास ऋषींच्या जन्मदिवस  गुरु पौर्णिमा म्हणून  साजरा केला जातो. व्यास ऋषी संस्कृतचे गाढे अभ्यासक आणि विद्वान व्यक्तिमत्व होते.  त्यांच्या लेखणी पासून जगातला कोणताही विषय अस्पर्श राहू शकला नाही. याचे कारण असे की भारतीय संस्कृतीतले चारही वेद म्हणजेच ऋग्वेद , अथर्ववेद,  यजुर्वेद , सामवेद यांची रचना व्यास ऋषींनी केली आहे. यामुळे "ग्रंथ हेच गुरु!" हे विधानही स्पष्ट होते. 
 
मानवी जीवनात ग्रंथांना फार महत्त्वाचे स्थान आहे माणसाचे वर्तमानकालीन जीवन हे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्याशी जोडलेले असते. माणसाला भूतकाळात डोकावून बघायला आणि भविष्यकाळाची स्वप्ने रंगवायला कोण शिकवत असेल तर ते ग्रंथच!! ग्रंथ हे धरणा सारखे असतात. मागील काळातील सर्वच ज्ञान त्यात साठवून ठेवलेले असते. आपल्या आजच्या जीवनाची पार्श्वभूमी,  इतिहास आणि विविध क्षेत्रांतील प्रगती आपल्याला ग्रंथांमुळे जाणून घेता येते. असं म्हणतात की आजच्या मालिका किंवा चित्रपट यांच्या कोणत्याही कथानकाचा महाभारतातील पात्रांशी संबंध लागतोच, आणि महाभारत म्हणा किंवा रामायण दोन्ही ग्रंथरूपी महाकाव्य. याशिवाय अनेक पुरातन ग्रंथापासून,  आजपर्यंत लिहिली गेलेली पुस्तके सर्वच आपल्याला जगायला शिकवतात! ग्रंथ हे असे गुरु आहेत ज्यांना गुरुदक्षिणा द्यावी लागत नाही,  ग्रंथामुळे माणसाला बहुश्रुतता प्राप्त होते. ग्रंथ आपले रंजन करतात त्याच प्रमाणे बुद्धीवर संस्कारही करतात. 

गुरु शिष्य यांचे अतूट नाते प्राचीन काळापासूनच पहायला मिळते सर्वोत्तम गुरु-शिष्य हा वाद तेव्हापासूनच सुरू आहे आणि आत्तापर्यंत अनेक शिष्य या कसोटीत खरे उतरले आहेत. इतिहासात अनेक गुरु-शिष्यांच्या जोड्या होऊन गेल्या पण त्यापैकी काही अशा आहेत ज्या नेहमीच लक्षात राहतील. 
धौम्य ऋषींच्या आश्रमात मध्ये शिक्षण घेणारा अरुणी हा त्यापैकीच एक. एके रात्री पडणाऱ्या जोरदार पावसामुळे आश्रमा शेजारील शेतीवर बांधलेला बांध फुटुन जाऊ लागला. धौम्य ऋषि यांनी शेतात पाणी जाऊ नये यासाठी सर्व शिष्यांना  पाणी आडवायला सांगितले. पाण्याचा प्रवाह जोराचा असल्यामुळे बांध फुटून जाऊ लागला,  त्यामुळे सर्व शिष्य माघारी परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी इतर शिक्षकांच्या लक्षात आले की अरुणी त्यांच्यासोबत नाही.  शेतावर जाऊन बघितले असता अरुणी त्यांच्या दृष्टीस पडला. तो बांध फुटलेल्या जागी स्वतः झोपला होता व रात्रभर त्याने पाणी अडवून धरले होते.त्याची गुरूभक्ती पाहून ऋषी  संतुष्ट झाले. 

पक्षाच्या डोळ्यावर नजर एकाग्र करून त्याचा अचूक वेध घेणारा अर्जुन व त्याला एकाग्रतेची जाणीव करून देणारे द्रोणाचार्य सर्वांनाच माहीत आहेत पण द्रोणाचार्यांचा पुतळा समोर ठेवून धनुर्विद्येचे ज्ञान घेणारा व गुरुदक्षिणा म्हणून मागचा पुढचा विचार न करता धनुष्य चालवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असणारा अंगठा कापून देणारा एकलव्यहाही तितकाच  श्रेष्ठ ठरतो!!

निवृत्तीनाथ हेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू परंतु तेच त्यांचे गुरूही होते. सर्व मराठी जनांना कळावी यासाठी ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांच्या  आज्ञेवरून संस्कृतभगवद्गीतेची मराठीतील भावार्थदीपिकेची रचना केली.

  भिक्षा मागत नवनाथ संप्रदायातील गोरक्षनाथ व त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथएका गावी आले त्या गावातील एका घरामध्ये कसला तरी समारंभ चालू होता. गोरक्षनाथांनी तेथे जाऊन भिक्षा मागितली, घरातल्या गृहिणीने आनंदाने त्यांना ती दिली व ती घेऊन ते झाडाखाली बसलेल्या आपल्या गुरूंजवळ गेले. त्या रुचकर पदार्थांमधले वडे मात्र गुरूंना फारच आवडले व त्यांनी गोरक्षनाथांचा जवळ त्याची मागणी केली. ते पुन्हा भिक्षा मागण्यासाठी त्या घरी गेले त्यावेळी मात्र परत येण्या बद्दल त्या गृहिणीने विचारले असता, त्यांनी गुरूंची इच्छा तिला बोलून दाखवली. तिला त्यांचे म्हणणे खोटे वाटल्यामुळे ती काहीशी संतापली व त्याना म्हणाली जर तू तुझा डावा डोळा मला दिलास तरच मी तुला वडे देऊन तुझ्या गुरूंची इच्छा पूर्ण करू शकते. गोरक्षनाथांनी मागचा-पुढचा विचार न करता आपली करंगळी डोळ्याच्या खोबणीत घालून डोळा काढून दिला हे पाहून मात्र ती गृहिणी घाबरली, थरथरत्या हाताने त्याने तिने त्याना वडे दिले व तिथून जाण्यास सांगितले. मच्छिंद्रनाथांना हा प्रकार कळला व त्यांना आपल्या शिष्याचा अभिमान वाटला त्यांनी त्याचा डोळा पूर्ववत करून दिला .

ह्यापैकी कथा- दंतकथा ह्या बद्दल वाद असला तरी हे सर्वच गुरु-शिष्य आज जगासमोर एक आदर्श म्हणून उभे आहेत.

पण गुरू होण्यासाठी काही वयाचा मोठेपण किंवा इतर बाबतीतले श्रेष्ठ पण असणं जरुरीचं नाही. आपल्याला जे ज्ञान घ्यायचे आहे ते देणारा प्रत्येकजण हा गुरु समानच असतो. 
एकदा एका राजाच्या बागेत त्याच्या आवडत्या फळांची चोरी झाली.  बागेचे कुंपण मोठे असतानाही ही चोरी होणे राजाला आश्चर्याचे वाटले. चोर शोधण्यासाठी राजाने सैनिकांना पाठवले, तर त्यांनी एका चांभाराला पकडून आणले. चांभाराने सांगितले की टपोरी फळे पाहून मनाला आवर घालता न आल्यामुळे मी त्यांची चोरी केली. परंतु राजाने त्याला पडलेला प्रश्न त्याला विचारला,  की कुंपण मोठे असतानाही तु फळे कशी काय नेलीस? तेव्हा तो चांभार म्हणाला की मी बालपणीच मंत्रोच्चाराने झाडांना खाली वाकवण्याची विद्या शिकलो आहे,  त्यामुळेच मी मंत्रोच्चाराने झाडे खाली वाकवून फळं काढली.  हे ऐकून राजा आश्चर्यचकित झाला. त्याने मंत्र शिकण्याची चांभाराकडे विनंती केली.दुसऱ्या दिवशी चांभार राजाला मंत्र शिकवायला आला. राजा शुचिर्भूत होऊन आपल्या आसनावर बसला तर त्याने चांभाराला खालीच मृगाजिन अंथरले होते.  विद्यार्जन व विद्याग्रहण सुरू झाले. एक लहान  मंत्र तर होता पण राजाला तो अजिबातच म्हणता येईना. चिडलेला राजा तिथून निघून गेला. तो बुद्धिमान होता परंतु मंत्र शिकू शकला नाही. राजाचा प्रधानमंत्री दूरदर्शी होता. त्याने राजाला सांगितले की गुरुप्रती श्रद्धा, सेवाभाव, निष्ठा आणि विनय यांनीच विद्या ग्रहण केली जाऊ शकते. हे ऐकून राजाच्या अंतर मनात खळबळ माजली. स्वतः उच्चासनावर बसुन गुरूला निच्चासन दिलेले त्याला कळले. प्रधानाचे ऐकताच राजाने उठून त्या चांभाराचे पाय धुतले, त्याची मनोभावे पूजा केली त्याला उच्चासनावर बसवले आणि त्यानंतर राजाने तो मंत्र बिनचूक म्हणून दाखवला.

 ही एक लहानशी बोधकथा आहे.परंतु गुरुचे श्रेष्ठत्व बिनचूकपणे सांगते. जो गुरुप्रती आस्था,  श्रद्धा व विश्वास ठेवतो त्यालाच विद्या प्राप्त होते. 

माननीय अब्दुल कलाम आपल्या गुरू बद्दल सांगताना म्हणतात, "मला माझ्या आयुष्यात निर्णायक टप्प्यांवर भेटलेली माणसे माझ्या जीवनाची शिल्पकार आहेत. माझ्या आई-वडिलांकडून प्रामाणिकपणा शिस्त,  श्रद्धा व समृद्ध इयत्ता या गोष्टी शिकलो. तर माझा पहिलावहिला मार्गदर्शक हा माझा जवळचा मित्र अहमद जलालुद्दीन! त्याच्याकडून प्रत्येक माणसामध्ये काहीतरी खास असतं हे ओळखायला शिकलो. त्याने माझ्यातली चमक ओळखली आणि मला प्रोत्साहन दिलं मला शिकवलं त्यामध्ये कृत्रिम आधुनिकता नव्हती, उलट त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थेट आणि अंतःप्रेरणेने नुसार होता. बरेचदा मी स्वतः काही सांगण्या आधीच त्याला माझे प्रश्न माझ्या महत्त्वाकांक्षा कळत असत. मग ते माझ्याकडून काढून घेऊन मला जीवनध्येय आखायला तो मदत करीत असे."

सांगण्याचा उद्देश हाच की असा प्रत्येकाच्या जीवनात एक ना एक गुरु असतोच जो आपल्याला आपल्या जीवनाचे उद्दिष्ट साध्य करण्यात सोबत देतो. अशा सर्व गुरु पुढे नतमस्तक होणे हेच ह्या गुरुपौर्णिमेचे अभिप्रेत!!

आजच्या पिढीला गुरुपौर्णिमेची आठवण ही व्हाट्सअप वरील पॉप अप्स  मुळे होते परंतु हे ही नसे थोडके! आता इन्स्टंट चा जमाना आहे त्यामुळे यशाच्या वाटेवर जलद गतीने प्रवास करणारा गुरु सर्वाधिक लोकप्रिय असतो.  काळ बदलला त्याप्रमाणे गुरु बद्दलच्या कल्पनाही बदलल्या.

चिनी विचारवंत कन्फ्यूशियसला एका शिष्याने विचारले की 'मृत्यु चे महत्व काय?' त्यावर त्याने उत्तर दिले की अजून आपल्याला जीवनाचेच महत्त्व कळलेले नाही, मग मृत्यूचे कसे कळणार? त्यामुळे या जीवनाचे महत्त्व समजण्यासाठी आपल्याला गुरुची गरज असते. 
अशा या गुरूचा आपल्या जीवनाला लाभलेला सहवास परीसस्पर्शापेक्षा काही कमी नसतो. अशा  समस्त गुरूवर्गासाठी ह्या दोन ओळी 
  
                     तुमच्या इच्छा आमची स्फूर्ती
                      तुमची स्वप्ने आमच्या ज्योती 
           बळ आमच्या पंखातून वाहे कि तुमची माया
            त्या मायेची उब लाभता तेज मिळे सद्भावा
                               गुरुदेवा गुरुदेवा।

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मराठी माणुस

सुंदर साजिरा श्रावण आला!

विज्ञानाच्या वाटेवर...!