जाणता राजा!!

  शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप।         शिवरायांचा आठवावा साक्षेप अवघ्या भूमंडळी।।
असा संदेश देणाऱ्या श्री समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांचा "श्रीमान योगी" असा सार्थ उल्लेख केला आहे.शिवरायां पूर्वी अनेक राजे होऊन गेले आणि नंतरही अनेक राज्ये उदयाला आली पण आज तीनशे वर्षानंतरही सर्वांना आदर्श राजा म्हणून आठवतात ते केवळ शिवरायच! सर्वांच्या  ओठी नाव आहे ते फक्त शिवरायांचेच! 

सध्याच्या परिस्थितीत जेव्हा एखाद्या कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वाची उणीव भासते तेव्हा भूतकाळातील या कर्तव्यकठोर थोर व्यक्तीची आपल्याला प्रकर्षाने आठवण होते. 
'आज शिवाजी राजे असते तर ...!'लहानपणी हा निबंध बहुतेक जणांनी लिहिला असेलच, पण तेव्हा तो लिहिताना आपल्या देशातील प्रत्येक क्षेत्रातील अंदाधुंदीची जाणीव आपल्याला तीळमात्रही नव्हती. सोशल नेटवर्किंग साइटवर आज अनेक जण या महामानवा वर बोटं उठवताना दिसतात, नाव ठेवताना दिसतात. राजाचे सिंहासन हे रत्नजडित असतच पण काटेरी सुद्धा असतं.  आज तीनशे वर्षानंतरही महाराजांना त्याचे काटेरी पण अनुभवावे लागतेय यापेक्षा आणखी वाईट गोष्ट कोणती असणार आहे? म्हणजे जी व्यक्ती स्वराज्यासाठी लढली, नव्हे नव्हे स्वबळावर तिने स्वराज्य उभे केले, जिच्यामुळेआज भारताच्या नकाशात महाराष्ट्र अभिमानाने मिरवतोय त्याच महाराष्ट्रात राहून आपण त्याच योगी पुरुषाबद्दलअद्वातद्वा बोलणे ह्यावरून नक्की काय सिद्ध करायचे आहे? लोकशाहीने प्रत्येकालाच मनातले विचार मांडण्याची मुभा नक्कीच दिली आहेपण ज्यांच्या बद्दल आपण बोलणार आहोत त्यांची थोडी तरी माहिती आपल्याला असू नये,  त्यांच्या प्रतिष्ठेची जाणीव आपल्याला असू नये हेच कोड्यात टाकण्यासारखे आहे. सो कॉल्ड फ्रीडम ऑफ स्पीच च्या नावाखाली काहीही खपवून कसं घेतलं जाईल? 

ते सर्व वाचून मन विषण्ण  झालं,  डोळ्यात पाणी आलंच पण त्याहीपेक्षा जास्त त्या प्रत्येकाची कीव करावीशी वाटली. खरच एवढा आत्मविश्‍वास येतो कुठून?
रयतेच्या सुखासाठी महाराजांनी जिवाचं रान केलं,  शत्रूशी दोन हात केले, आदर्श स्वराज्याची निर्मिती केली, त्यांची प्रत्येक गुणवैशिष्ट्य प्रत्येकाने आदर्श घ्यावीत अशीच आहेत शिवाजी महाराजांची कीर्ती ही मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहेच, पण जागतिक दर्जाचे योद्धे व आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणूनही महाराजांची ओळख आहे . शिवराय ज्यांच्याशी लढले त्यांनी हे महाराजांचे श्रेष्ठत्व मान्य केले म्हणूनच महाराज "श्रीमानयोगी"  होते. 
 
      शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे।
                  शिवरायांची सलगी देणे कैसे असे ।।
       सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधीजे योग ।
                  राज्य साधनेची लगबग कैसी केली।। 

महाराज सर्वधर्मसमभाव मानणारे होते. धर्म वेडाने राज्य मोठे होत नाही अशी त्यांची धारणा होती. हिंदू धर्माचे रक्षण त्यांनी केले पण ते करत असताना कधी दुसर्‍या धर्माचा द्वेष केला नाही . गुणांची उत्तम जाण असलेल्या राजांजवळ सर्व गुणसंग्रहकता होती.  स्वतःला ते 'जगदंबेचा भुत्या' म्हणवुन घेत.  "हे राज्य प्रजेचे आहे तर तो जगन्नियता या सर्वांचा स्वामी! आम्ही केवळ प्रजेचे विश्वस्त! "असे त्यांचे म्हणणे असे. शुन्यातून राज्य निर्माण करूनही त्यांना त्याबद्दल लालसा नव्हती.  सामान्य माणसाला देशभक्तीची प्रेरणा देऊन त्यांनी आपले सैन्य घडवले होते. राजे प्रजाहितदक्ष होते, दूरदर्शी , होते अन्यायाची व भ्रष्टाचाराची त्यांना अत्यंत चीड होती. महिलांविरुद्ध अत्याचाराला महाराजांनी कधीच थारा दिला नाही स्त्रियांची इज्जत कायम राखली पाहिजेमग ती कोणीही असो, अशी महाराजांची शिकवण होती. 

 महाराज सुरतेवर चाल करून गेले तेव्हाचा एक प्रसंग आहे.  शिवाजी महाराज वेशी वर येऊन ठेपले होते, सुरतच्या पूर्वेला असलेल्या बुऱ्हाणपूर दरवाजाजवळ फौजेची छावणी पडली. तांबडं फुटलं,  पक्ष्यांची किलबिल सुरू झाली आणि राजांनी सुरतेच्या दिशेने इशारा केला. सरलष्कर नेताजींना राजे म्हणाले, "बायका मुलं, गोरगरीब देऊळ, मशिदी कशालाही तोशीश लागता कामा नये ,व्यापाऱ्यांना त्रास होता कामा नये पण ही मोगली मिजास उतरवा." नेताजीनी वेगवेगळी पथके तयार केली अशाच एका पथकाचा प्रमुख होता हिरोजी बरोबर त्याचा साथीदार माणकोजी. मराठी फौज सुरतेच्या गल्लीबोळात फिरू लागली त्या संपन्न  मूलखाची त्यांना नवलाई वाटली, आपल्या राकट दगडधोंड्याचा देशात त्यांनी अशा कुबेराच्या गल्ल्या कधी पाहिल्या नव्हत्या. धनिक मंडळी वाड्यांचे दरवाजे लावून संपत्ती लपवायच्या मागे लागले. पैशांची मोहोळ दाखवायला 'नजरबाज' होते. रस्त्यावर फारसं कोणी नव्हतं, गोरगरीब आपली बोचकी घेऊन सैरावैरा पळत होती पण खरं तर त्यांना काहीच भीती नव्हती. नजरबाजान हिरोजीला अदा बेगमची हवेली दाखवली. अदा बेगम म्हणजे विलासी सुरतची शान होती . तिच्या हवेली मध्ये एर्या गैर्या  माणसाची पाय टाकण्याची हिंमत होत नसे. सुरत मधली बडी असामीच तिच्याकडे पायधूळ झाडायची.त्यामुळे व्यापारी नसूनही अमीरांच्या यादीमध्ये तिचं नाव होतं . ती आरस्पानी सौंदर्याची खूबसूरत खाणच होती. हवेली पाहून क्षणभर हिरोजी थबकला त्याला कळेना की बाईमाणसाच्या वाड्यात घुसायचं की नाही? परंतु नजरबाजाराने त्याला पुढे केले. क्षणात तिच्या पहारेकर्‍यांनी त्यांना घेरलं, सरसरत तलवारी बाहेर निघाल्या एकमेकींना भिडल्या. "लुटेरे कही के, हमारा मरातब नही जानता एक इशारा कर दू तो जान चली जायेगी! तुम्हारी औकात क्या है?" चाललेला प्रकार पाहून अदा पुढे सरसावत म्हणाली. तोच नजरबाज पुढे आला आणि म्हणाला, अदाबाई हम शिवाजी राजा के लोग है , कोई मामुली चोर नही आपकी जो भी दौलत है हाजीर करो!  राजांचं नाव ऐकून तीचं धाबं दणाणलं व थरथरत तिने कालच सलीम बोहरा ने दिलेला हिरेजडित कंठा पुढे केला, त्या सरशी तिथे असणाऱ्या सलीमची झापड तिच्या गालावर पडली. "औरत वर हात टाकतो?"चवताळलेल्या हिरोजीने क्षणात पुढे येऊन वार टाकला,  सलीमचा उजवा हात मनगटापासून कलम केला. घाबरलेल्या अदाला नजर बाजाने सांगितलं,' बाई हम सुरत लुटने आये है लेकिन किसी औरत पर हात नही पडेगा, ना किसी के इज्जत पर, कोई दूसरा अगर हात डाले तो फिर उसकी भी खैर नही.' "आमच्या राजानं आम्हाला आया-बहिणींची इज्जत करायला शिकवले लुटायला नाही"  हिरोजी म्हणाला. 
लुटेरे आहेत पण इज्जत लुटणार नाहीत,  यांना लुटेरी तरी कसं म्हणायचं?  तशाही परिस्थितीत क्षणभर तिला राजांचं आणि त्यांच्या अशा माणसांचं कौतुक वाटलं!
 
ही होती महाराजांची शिकवण जी प्रत्येक मावळ्याच्या मनावर अगदी कोरलेली होती . यातून घेण्यासारखे एकच आहे, की ज्या वेळी आपण आपल्या महाराजांना आपले दैवत म्हणतो, स्वतःला त्यांचे मावळे म्हणून मिरवतो त्यावेळी आपण ह्या कसोटीमध्ये खरे उतरलेच पाहिजे. भले समोरची व्यक्ती चुकली असेल पण तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे , तिला अर्वाच्च भाषेत बोलणे ही महाराजांची शिकवण कधीच नव्हती.  आज जर महाराज असते तर त्यांना त्यांच्यावर टीका करणाऱ्या पेक्षा ह्या गोष्टीचे जास्त वाईट वाटले असते. विरोध नक्कीच करावा पण महाराजांचे मावळे म्हणून जर तो विरोध असेल तर महाराजांची, महाराजांच्या विचारांची छाप आपल्या आचारांमध्ये दिसलीच पाहिजे!!

काही दिवसांपूर्वी सोशल नेटवर्किंग वर आणि एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये नॅशनल युथ पार्लमेंटमध्ये पुरस्कार स्वीकारल्यावर मनोगत व्यक्त करताना युवती म्हणाली,
 मे उस देश की नागरिक हु,  जहां छत्रपती शिवाजीमहाराज और सम्राट अशोक जैसा राजा था। 
 मै उस देश के नागरिक हुं जहा पचास मेल पर रंग-रूप पहनावा और मजहब बदल जाता।
 था मै उस देश की नागरिक हू जहा डाल डाल पर सोनेकी चिडीया को पाया जाता था।
 मै उस देश की नागरिक हू जी से अपने भूगोल से पहले इस ब्रह्मांड भूगोल समज आता था ।
आज गरज आहे ती अशा सकारात्मक विचारांचा झरा असणाऱ्या तरुणाईची!

महाराजांच्या एकेरी नावाच्या संबोधनावरूनही आज अनेक वाद सुरु आहेत. तर महाराजांचे सरनोबत हंबीरराव म्हणायचे त्याप्रमाणे छत्रपतींची गादी म्हणजे मस्करी नव्हे.  सर्वात आधी छत्रपती मग बाकी सारे. त्यामुळे सर्वश्रेष्ठ असणाऱ्या राजांचा उल्लेख जर कोणी एकेरी केलाच तर तो नक्कीच सुज्ञ नसावा, आणि छत्रपती म्हणजे काही सर्वसामान्य नव्हे, 
'महाराजांना दैवत मानून त्यांची पूजा करून त्यांचा आदर्श समोर ठेवून सैन्यात भरती होणाऱ्या सैनिकाचा ध्यास आहे छत्रपती!! '
'महाराजांच्या आचार विचारांनी प्रेरित होऊन आपल्या जीवनाला समृद्ध करणाऱ्या तरुणाईचा विश्वास आहे छत्रपती!!'

आज महाराज जरी नसले तरी त्यांची अस्मिता ही सर्वांसाठीच प्रेरणास्त्रोत आहेत्यामुळे एक दिशादर्शक म्हणून समाजाला त्यांची गरज कायमच असेल. त्यांच्यातील नेता, धुरंधर सेनानी ,जाणता राजा अशा असंख्य गुणांची ओळख या समाजाला पदोपदी होत राहील.
        निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारु।
           अखंडस्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी।।

Comments

  1. एकदम मनाला भावला..😊
    असेच लेख लिहीत रहा..👍
    🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩

    ReplyDelete
  2. जय भवानी जय शिवाजी 🚩

    ReplyDelete
  3. 🚩जय भवानी जय शिवाजी 🚩

    ReplyDelete
    Replies
    1. 🚩जय भवानी जय शिवाजी

      Delete
  4. 🚩जय भवानी जय शिवाजी 🚩

    ReplyDelete
  5. राजाचे सिंहासन हे रत्नजडित असतच पण काटेरी सुद्धा असतं

    भरपूर उत्तम लिहले आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मराठी माणुस

सुंदर साजिरा श्रावण आला!

विज्ञानाच्या वाटेवर...!